गुजरात स्पर्धेत असतानाही खान्देशातील केळीचा दबदबा कायम ; उत्पादकांनाही दिलासा, किती मिळतोय भाव?

जुलै 30, 2025 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । जळगावसह खान्देश केळीसाठी प्रसिद्ध असले तरी आता देशातील काही ठिकाणी केळीचे उत्पन्न घेतलं जात आहे. यामुळे केळी बाजारात स्पर्धा वाढल्याचं दिसतेय. यातच उत्तर भारतातून श्रावण मासानिमित्त खान्देशातील केळीला चांगली मागणी असताना गुजरातमधील केळीही तिथे पोहोचली आहे. मात्र गुजरात स्पर्धेत असल्यानंतरही निव्वळ गुणवत्तेमुळे खान्देशातील केळीने आपला दबदबा कायम राखून आहे. बाजारातील वाढत्या स्पर्धेचा केळी दरावर फार मोठा परिणाम न झाल्याने उत्पादकांनाही दिलासा मिळाला आहे.

banana

जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या नवती केळीची काढणी सध्या वेगाने सुरू असून, बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, एकट्या बऱ्हाणपूर बाजार समितीत सद्यःस्थितीत २५० ते ३०० गाडी आणि इतर भागातून १२५ ते १५० गाडी केळीची आवक दररोज होत आहे. सध्याच्या श्रावण मासामुळे बाजारात सध्याच्या घडीला इतर कोणत्याही हंगामी फळांची उपलब्धता नसल्याने उत्तरीय राज्यांमध्ये यापुढील काळातही केळीला मागणी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या कारणाने आवक वाढल्यानंतरही केळीच्या भावावर म्हणावा तसा लक्षणीय परिणाम दिसून आलेला नाही.

केळीला मिळतोय इतका भाव?

खान्देशसह बऱ्हाणपूरलगतच्या भागातून केळीची मोठ्या प्रमाणात काढणी सुरू झाल्याने बऱ्हाणपुरात आता आवकेत अचानक मोठी वाढ झाल्याने केळीचे भावही काही प्रमाणात खाली आले आहेत. तरीही बऱ्हाणपुरात प्रति क्विंटल १७०० रूपयांपर्यंत भाव केळीला मिळत आहे. दुसरीकडे, रावेरमध्येही नवती केळीला १९०० ते २१०० रूपये प्रति क्विंटलचा भाव आहे.

दरम्यान आता उत्तर भारतातील व्यापारी गुजरातमधील केळीला त्यामुळे बरेच प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परिणामी, खान्देशात उत्पादित होणाऱ्या केळीसमोर मोठे आव्हान देखील उभे राहिले आहे. केळी भाव सुद्धा काहीअंशी दबावातच आहेत. अशाही परिस्थितीत निव्वळ मालाची गुणवत्ता चांगली असल्याने खान्देशातील केळी उत्तर भारतात आपला दबदबा कायम राखून आहे. वाहतुकीच्या दृष्टीने विचार करता खान्देशातून राजस्थानमध्ये रस्ते मार्गे केळी पाठवायची झाल्यास १८ ते २० तास लागतात. त्याच वेळी गुजरातमधून निघालेली केळी राजस्थानात १२ तासातच पोहोचत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now