जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या चिन्हावर व अपक्ष असे एकूण ३२१ जण रिंगणात होते. त्यातील निम्म्याहून अधिक उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१ उमेदवारांपैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

महापालिका निवडणुकीत उभ्या बहुतांश अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. अपक्षांची संख्या मोठी असली तरी, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे.

नियमानुसार, एकूण मतदानाच्या ठराविक मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या या निवडणुकीत मोठी आहे.

महापालिकेची ५५ कोटींची कमाई
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि कर वसुलीच्या मोहिमेमुळे महापालिकेच्या तिजोरीत ५५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मागील वर्षी ही वसुली १०२ कोटी रुपये होती. यंदा प्रशासनाने १० टक्के वाढीसह ११२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले असून एकूण मागणी २०० कोटींच्या घरात आहे. जप्त झालेली अनामत रक्कम ही या महसुलात भर टाकणारी ठरेल.








