⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

चाळीसगाव तालुक्यात अवकाळीचा फटका : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । 26-28 फेब्रुवारी दरम्यान चाळीसगाव तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यात ६३ गावांना फटका बसला आहे. या गावामधील ८२१२ शेतकऱ्यांचे ५५६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.तिसऱ्या दिवशी सुद्धा लोंढे गाव आणि शिवारात वादळी पावसाने पिकांचे नुकसान केले.

तालुक्यातील मेहुणबारे, लोंढे, चिंचगव्हाण, उपखेड, पिलखोड, तामसवाडी, वरखेडे, तिरपोले, विसापूर, रामनगर, पिंपळगाव म्हाळसा, दहिवद, आडगाव, जमडी, जावळे, वाघले, सेवानगर, चिंचखेडे, मांदुणे अजून इतरही गावे बाधित झाली. तालोंदे प्र., रोकडे गावात वादळी पाऊस झाला. १९७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २५६० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहें.

चाळीसगाव तालुक्यात झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वरखेडे, लोंढे, विसापूर तांडा, दरेगाव, मेहुनबारे परिसरातील खेडे आणि तालुक्यातील बऱ्याच खेड्यांमध्ये तीच परिस्थिती उद्भवली आहे. अवकाळी पाऊस गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, केळी ,मका ही पिके अक्षरशा जमीनदोस झालेली आहेत. मका, बाजरीचे पीक आडवे झाल्यामुळे पूर्ण मातीमोल झालेले आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडलेले आहेत .कापसाचा भाव दहा हजार रुपये पर्यंत जाईल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. शेवटी कापूस आयातीमुळे भाव 5000 रुपये रुपयेच्या जवळपास आला. किती दिवस कापूस सांभाळणार या काळजीत शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकावा लागला. कांद्याचा बाबतीतही भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल जाईल अशी आशा शेतकरी करत असताना भाव खाली पडले.

अशा परिस्थितीत शेतकरी तोंड देत असताना गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाया गेले आहे. एकीकडे ऊस ,कापूस, केळी, मका या पिकांना भाव नाही जेमतेम पीक शेतात उभे राहिलेले असताना , थोडेफार पीक विकून पैसे येतील. या आशेत जगत असताना अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकरी फार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पूर्ण चाळीसगाव तालुक्यात दिसत आहे.

एकीकडे निसर्ग अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिके उध्वस्त करत आहे आणि दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात आपले कष्टाचे पीक विकावे लागत आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांना कोणी वाले नाही असे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. तरी शासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त गावात तात्काळ पंचनामे करून, झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्ष , राष्ट्रीय जनमंच किसान मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला