मार्चमध्ये उष्णतेचा तडाखा ; जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये घट, कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?

मार्च 13, 2026 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२६ । मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत असून उष्णतेचा कडाका वाढल्याने जळगावकर हैराण झाले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या वर गेला आहे. यातच उन्हाची तीव्रता आणि त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा काहीसा कमी झाला आहे.

dam

दि.१२ मार्चच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९.६४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष गिरणा धरणातील जलसाठा आता ५० टक्क्यांखाली गेला असून यामुळे आगामी चार महिन्यांच्या कालावधीत जनतेला पाण्याचा वापर सावधपणे करावा लागणार आहे.

गेल्यावर्षी मान्सूनकाळात पुरेसा पाऊस पडला. डिसेंबर महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे भोकरबारी वगळता सर्वच प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला. गिरणा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तन सोडल्यानंतर जलसाठ्याची टक्केवारी सत्तरीच्या घरात आली. मात्र मागच्या काही दिवसापासून उष्मा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन व्हायला लागले. त्यामुळे सध्या गिरणेचा जलसाठा ५० टक्क्यांखाली गेला आहे.

जळगावकरांना दिलासा

दिलासादायक म्हणजे जिल्ह्यात वाघूर प्रकल्पात सर्वाधिक ८३.८६ टक्के जलसाठा आहे. वाघूर धरणातूनही आवर्तन सोडण्यात आले. मात्र पुरेसा साठा असल्याने जळगावकरांना यंदा पिण्याच्या पाण्यासाठी काळजी करण्याची गरज नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी वाघूरमध्ये ८४.४५ टक्के इतका जलसाठा होता.

प्रकल्पनिहाय जलसाठा
प्रकल्प आणि उपलब्ध टक्केवारी
हतूनर : ६०.७८
गिरणा : ४९.०९
वाघूर : ८३.८६
मन्याड : ४८.७२
बोरी : ३१.७१
भोकरबारी : ४८.९९
सुकी : ८१.४६
अभोरा : ७९.८०
अग्नावती : ६६.९८
तोंडापूर : ५६.०९
हिवरा : ३५.९२
मंगरुळ : ६५.८८
बहुळा : ६०.८४
मोर : ७३.३७
अंजनी : ६७.९१
गूळ : ७०.५९
शेळगाव बॅरेज : ७०.६७

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now