जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. संजय अर्जुन पाटील (वय ४१) असे शेतकऱ्याचे नाव आहे. एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रिंगणगाव येथील संजय अर्जुन पाटील (वय ४१) या शेतकऱ्याकडे सुमारे चार एकर बागायती व कोरडवाहू शेती आहे. गत वर्षी कापसाचे अपेक्षित उत्पन्न न झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या संजय पाटील यांनी कांद्याची लागवड केली. मात्र, सद्यःस्थितीत कांद्याच्या दरात ही घसरण झाल्यामुळे बँकेचे व खासगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत संजय पाटील होते. संजय पाटील यांनी २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मी बाहेर जाऊन येतो, असे सांगितले. परंतु, संजय पाटील रात्रभर घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांचे बंधू विजय पाटील, काका नामदेव तुकाराम पाटील यांनी संजय पाटील यांच्या शोध घेतला मात्र ते आढळले नाहीत. दरम्यान, दिलीप भगवान नेवे यांच्या शेतातील विहिरीजवळ बूट आढळल्याने ग्रामस्थांच्या मदतीने संजय पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी नामदेव पाटील यांच्या माहितीवरून एरंडाेल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात हवालदार राजेश पाटील करत आहेत. मृत संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.