वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे सातपुड्यात वृक्षांची हानी

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेल्या डोंगररांगा हेच खान्देशाचे वैभव आहे. हे वैभव टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून यामध्ये अधिक महत्वाची जबाबदारी वनविभागाची आहे.

मात्र वनविभागाच्या नाकर्ते पणामुळे डोंगररांगांना दरवर्षी वणवे लागून वन्यप्राण्यांसह वृक्षसंपदेची अपरिमित हानी होत आहे. गेल्या काही वर्षात सातपुडा पर्वतावर कुठे ना कुठे वणवा लागत आहे. यामुळे डोंगरावर आगीचे लोळ उठतांना दुरूनच दिसून येतात. या भीषण आगीत गवताची राख झाली, वनऔषधी करपल्या, वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट होऊन चिमुकल्या प्राण्यांची पिल्ले होरपळून गेली. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत. जंगलात डिंक गोळा करण्यासाठी गेलेल्या व शिकाऱ्यांकडून बिडी, सिगारेट मुळे किंवा परस्परविरोधातून या आगी लावल्या जात असल्याचे वनविभागाकडून सांगून सारवासारव करण्यात येत असते.

दरवर्षी वनविभागाच्या यावल व चोपडा परिक्षेत्रामध्ये वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून जरूरीची असली तरी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने सातपुडा पर्वत वणव्यापासून सुरक्षित राहिला नसल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे. वन विभागामध्ये वनालगतच्या गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, तरीही वणवे लागून अपरिमित हानी टाळण्यास वनविभागाला अपयश येत आहे. काळाची गरज म्हणून डोंगररांगांना लागणारे वणवे थांबवण्यासाठी वनविभागाने यापुढे काही तरी वेगळा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.