जळगाव लाईव्ह न्यूज । पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू असतो. कारण याकाळात चहूबाजूला हिरवागार निसर्ग असतो. अशा वातावरणात आपला थकवा दूर होऊन आपल्या मनाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात फिरण्याचे अनेक ठिकाण आहेत. यातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेला जामनेर तालुक्यातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय.


जामनेर तालुक्यातील गोद्री येथील डालकीची धार हा धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे. शेकडो पर्यटकांनी या धबधब्याचा आनंद घेतला. उंचावरून कोसळणारे आणि फेसाळणारे पाणी, धुक्याचे वातावरण यामुळे पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करीत असतो.


डालकीची धार हे ठिकाण निसर्गप्रेमी, भटकंती करणारे, ट्रेकर्स, आणि फोटोग्राफर्स यांच्यासाठी एक परिपूर्ण गंतव्य आहे. येथे सेल्फी पॉइंट्स, निसर्गचित्रण आणि ट्रेकिंगसाठी उत्तम संधी आहे.

जळगाव शहरापासून हा धबधबा जवळपास 78 किमी, जामनेरपासून 40 किमी तर गोद्री गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. अजिंठा लेणी पासून 20 किमी व फत्तेपुर पासून 8 किमी आहे. गोद्री पासून 3 किमी अंतरावर अजिंठापर्वत रांगांमध्ये असलेला हा 300 फूट उंचीचा धबधबा आहे ह्या दिवसांमध्ये चहू बाजूंनी हिरवळ असते सुट्टीच्या दिवशी खूप सारे पर्यटक डोंगरातून वाट काढत मुलाबाळांसोबात निसर्गरम्य हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात








