जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाची (डी.एस.ग्राऊंड) प्रचंड दुरवस्था झाल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेने बसविलेल्या ग्रीन जीमजवळ चिखल निर्माण झाला आहे तर गेल्या महिन्यातच पालिकेने पावसानंतर या ठिकाणी मुरुम टाकला, मात्र गुरुवारी रात्री झालेल्या पावसानंतर पुन्हा चिखल झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत ओह.

स्व.निखील खडसे स्मृती चषकाच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाची दुरुस्ती झाली. पालिकेने मैदानाच्या डागडूजी, रंगरंगोटीसाठी किमान दहा लाख रुपयांचा खर्च केला तसेच या मैदानावर सुमारे 57 लाखांच्या खर्चातून ग्रीन जीम बसविली. पावसानंतर मैदानाची स्थिती मात्र बिकट झाली. गेल्या महिन्यात झालेल्या पावसानंतर ग्रीन जीमजवळ चिखल साचला होता. नागरीकांकडून वापर होत नसल्याने यानंतर पालिकेने या ठिकाणी मुरुम टाकला मात्र गुरुवारी रात्री झालेल्या पावसानंतर पुन्हा ग्रीन जीमजवळ चिखल झाल्याने वापर बंद झाला आहे. सुमारे 57 लाखांचा निधी खर्च करुन बसवलेली ग्रीन जिम यामुळे वापरात नसल्याने क्रीडाप्रेमींमधून पालिकेच्या प्रशासकिय कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

मैदानावर पालिकेने बसविलेल्या एका वीज पोलची चोरी झाली आहे. समाजकंटकांनी रात्रीतून हा पोल कापून नेल्याची माहिती आहे. पालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणारी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.








