जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेच्या तडाखा वाढल्याने नागरिक होरपळून निघत आहे. या उष्णते लाटेसोबतच आगीच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत असून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील जामनेर, यावल आणि पारोळा तालुक्यांत लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख ८५ हजार रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन हातात आलेला तोंडचा घास आगीने हिरावून नेल्याने बळीराजा संकटाच्या खाईत लोटला गेला असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून थेट मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

कुठं-कुठे लागली आग
पारोळा तालुक्यातील बोळे शिवारात २३ एप्रिल रोजी झालेली घटना उशिराने समोर आली आहे. शेत गट क्रमांक १४९/१ मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही आग शेजारील चंद्रकला अशोक पाटील आणि यशवंत भावराव पाटील यांच्या शेतात पसरली. यात कापून ठेवलेला सुमारे १४० क्विंटल मका आणि ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. या घटनेत अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ७ मे रोजी पारोळा पोलीस ठाण्यात यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

तसेच यावल तालुक्यातील बामणोद शिवारात चंद्रकांत भागवत तळेले यांच्या शेतात ७ मे रोजी दुपारी भीषण आग लागल्याने पत्नीच्या नावावर असलेल्या शेतातील ४,५०० केळीची झाडे (पिलबाग) आणि ठिबक सिंचनाच्या नळ्या जळाल्या. यामध्ये ठिबकचे १,२५,००० रुपये आणि केळीचे ४०,००० रुपये असे एकूण १,६५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात सफौ संतोष चौधरी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
तर ६ मे रोजी जामनेर तालुक्यातील रांजणी शिवारात विनोद जगदेव मगरे यांच्या शेतात अचानक आग लागली. या आगीत साठवून ठेवलेली सुमारे ६० क्विंटल ज्वारीची गंजी पूर्णपणे जळून खाक झाल्याने अंदाजे १,२०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद केली असून पोना सचित्तानंद अहिरे तपास करत आहेत.







