जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२४ । खरीप हंगाम २०२३ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान खरीप पीक विमा काढला होता, अशा शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात ५२३ कोटींची रक्कम पडणार आहे. राज्य शासनाने आपल्याकडील हिश्शाची रक्कम विमा कंपनीला भरली असल्याने, नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०२३ मध्ये राज्य शासनाकडून १ रुपयात खरीप पीक विमा काढण्याची योजना सुरू होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार १२८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. खरीप हंगामात अतिवृष्टी, पावसाचा खंड पडल्यामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जाते. २०२३ मध्ये खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे.
जुलै महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम मंजूर झाली होती. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम जास्त झाल्यामुळे यामधील काही रक्कम ही राज्य शासनाला भरावी लागते. ही रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळू शकली नव्हती. मात्र, आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पडणार आहे.