जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान..

सप्टेंबर 25, 2025 12:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांसह घरांचं, जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याला देखील या पावसाने तडाखा दिला आहे.

affected by heavy rains

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक नुकसान या चार दिवसांत झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. ८० हजार शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांमधील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. ३३ टक्क्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पैकी कपाशी लागवडीखालील क्षेत्राचे सर्वाधिक ४४ हजार ६२२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय, १४ हजार ३६९ हेक्टरवरील मका, २८३० हेक्टरवरील सोयाबीन, १३३२ हेक्टरवरील बाजरी, ५०६ हेक्टरवरील कांदा, ४४० हेक्टरवरील तूर, ३५४ हेक्टरवरील फळपिके, ३०६ हेक्टरवरील इतर पिके, ८२ हेक्टरवरील केळी आणि ३६ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे भडगाव तालुक्यात २२ हजार ४९३ हेक्टर, पाचोरा तालुक्यात १९ हजार १८३ हेक्टर, एरंडोल तालुक्यात १५ हजार ४९१, पारोळा तालुक्यात ५१५१ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात २४३७ हेक्टर, जळगाव तालुक्यात ८९ हेक्टर, जामनेर तालुक्यात २७ हेक्टर आणि भुसावळ तालुक्यात ३.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now