⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

पाऊस रुसला ; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले असून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीरचं संकट ओढवलं आहे.

राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. जळगाव जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. मात्र, मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून महीना संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

पेरण्या खोळंबल्या

पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात जून महिन्यात फक्त २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही पूर्वहंगामी कापसाची लागवड अधिक आहे. काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात मका, उडीद, मूग व सोयाबीन लागवड देखील सुरू झाली होती. आता पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग व उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. येत्या काही दिवसात उडीद देखील जळून जाण्याची भिती आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागानं राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तविली आहेत. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.