जळगाव लाईव्ह न्यूज । नशिराबाद गावात बस स्टॅण्ड परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची अळी, नशिराबाद) असं अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नशिराबाद बस स्टॅण्ड परिसरात सराईत आरोपी कमलाकर महाजन हा स्वतःकडे घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, सपोनि नारखेडे यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांची धाडसी कारवाई
मिळालेल्या आदेशानुसार, पोलीस पथकाने बस स्टॅण्ड परिसरात सापळा रचला आणि रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी कमलाकर महाजन याच्यावर अचानक छापा टाकला. पोलिसांनी त्याला जागीच पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक लोखंडी चंदेरी रंगाचा आणि काळ्या प्लास्टिकची मूठ असलेला गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १२३/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. राजेंद्र ठाकरे करत आहेत.









