वरणगाव : फिल्मी स्टाईलने मालगाडीवर चढून लाखों रूपयांचा कोळसा होतोय चोरी..

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । जिल्ह्यात आधीच घरफोडीसह वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यात आता दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातमध्ये लागणारा कोळसा वरणगाव व फुलगावमार्गे रेल्वेने वाहतूक करून आणला जातो. परंतु प्रकल्पाच्या काही अंतरावर धावत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ होत असून दररोज लाखों रूपयांचा कोळसा चोरी होत आहे. याबाबत वरणगाव पोलिसांत तीन संशयीतांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?
दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशा वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा चोरण्यासाठी ३०ते ४० लोकांची टोळी तयार केल्याची चर्चा आहे. टोळीतील मंडळी गुन्हेगारी क्षेत्रात प्रख्यात असल्याने त्यांना ना आरपीएफची भीती आहे, ना पोलिस व दिपनगरच्या सुरक्षा विभागाची भिती. त्यांची चोरीची शैली देखील कोणालाही पाहून आश्चर्य वाटेल. प्रकल्पाच्या २०० पावलांच्या अंतरावर या टोळ्यांमधील चोरटे चालत्या ट्रेनमधून कोळसा चोरण्यात पटाईत आहेत.

दिपनगर प्रशासनाच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षकांचा चोरट्यांवर कडक पहारा असतांना चोरट्यांनी निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दिपनगर प्रशासनाचा कोळसा चोरी करून नेत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसुळ यांनी ५ मार्चला पथक तयार करून फुलगाव जवळील सद्‌गुरु बैठक हॉलजवळ दुपारी दोन वाजता सापळा लाऊन होते. त्याच क्षणी दिपनगरकडून येणारे एक निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना पाहुन दुसऱ्या मार्गाने ट्रॅक्टर वळवून पळ काढला.

ट्रॅक्टरमध्ये रेल्वे वॅगनमधील चोरलेला कोळसा भरून पळून जात असलेल्या बापू बाविस्कर व जितू चंद्रकांत पाटील (दोन्ही राहणार फुलगाव) व एक अज्ञात यांना पोलिसांनी ओळखले. त्यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत या प्रकरणी औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले यांच्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस स्टेशनला सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.