कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर घरात घुसले अन्.. जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । जळगावमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येतेय. चोरट्यांना खाकी वर्दीचा धाकच शिल्लक नसल्याचे दिसून येतेय. अशातच जळगाव शहरात धाडसी दरोड्याची घटना घडलीय. या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना?
जळगाव शहरातील गुड्डू राजा नगरातील ढाके नगरातील प्रमोद घाडगे यांच्या घरात दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे ३ वाजता घडलीय असून कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुऱ्हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती. त्यापैकी खालच्या खोलीत झोपलेल्या प्रमोद घाडगे आणि त्यांच्या पत्नी या दोघांना दररोखोरांनी पैसे कुठे आहेत, अशी विचारणा केली. तसेच, घरात कोण कोण आहे हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे, असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले.

तिघांना खाली बसवून दरोडेखोर पुन्हा वरती गेले कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी पन्नास हजाराची रोकड तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेतली, तसेच बाहेर अंगणात हातातील लाकडं फेकून घाडगे यांची गाडी घेत त्या दुचाकीवरून पोबारा गेला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या धाडसी दरोड्याच्या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.