⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Crime : जुगारात जिंकलेल्या पैशांवरून वाद, तरुणाला मारहाण करीत केले रक्तबंबाळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात फटका जुगार खेळताना एक तरुण २५ हजार रुपये जिंकला होता. जुगारात जिंकलेले पैसे मागितल्याचा कारणावरून तरुणाच्या घरी जाऊन त्याला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना रात्री १२.१० च्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेत इम्रान शेख हमीद वय-२५ हा तरुण रक्तबंबाळ झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या जवळपास असलेल्या परिसरात अनेक ठिकाणी जुगार अड्डे आणि अवैध पत्त्यांचे क्लब सुरु आहे. पोलीस प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने जळगाव ग्रामीणच्या अवैधधंदे चालकांचे चांगलेच फावले होते. फटका जुगारात जिंकलेल्या पैशांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पिंप्राळा हुडको परिसरात घडला आहे. पिंप्राळा परिसरात सुन्नी मश्चिदजवळ इम्रान शेख हमीद हा तरुण कुटुंबासह राहतो आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

दि.१४ रोजी रात्रीच्या सुमारास इम्रान हा पिंप्राळा हुडको परिसरातील कच्ची खोली परिसरात जुगार खेळण्यास गेला होता. जुगारात तो २५ हजार रुपये जिंकला होता. जिंकलेले पैसे मागितल्याचा कारणावरून जाकीर पठाण, जावेद पठाण, रसूद पठाण यांच्यासोबत त्याचा वाद झाला होता. जुगारात जिंकलेले पैसे परत न दिल्याने इम्रान घरी निघून गेला होता. रात्री १२.१० च्या सुमारास इम्रान घरी असताना जाकीर पठाण, जावेद पठाण आणि रसूद पठाण यांनी लाकडी बॅट आणि चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात इम्रानला डोक्यात आणि डोळ्याजवळ इजा झाली असून तो रक्तबंबाळ झाला होता.

इम्रान शेख याच्या फिर्यादीवरून जाकीर पठाण, जावेद पठाण, रसूद पठाण यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कलसिंग बारेला हे करीत आहे. जळगाव ग्रामीण परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची असलेली मेहेरनजर शहरात गुन्हेगारी फोफावण्यास कारणीभूत ठरत आहे. पोलीस अधिक्षकांनी ग्रामीण भागातील अवैध धंद्यांकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे.