जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील २४ वर्षीय तरुणीने भावी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २५ मार्चला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रामेश्वरी रवींद्र नागपुरे (वय २४) असे तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ सुरू होती. अखेर १९ दिवसांनी १२ एप्रिल रोजी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तरुणीच्या कुटुंबीय, नातेवाईक, विविध सामाजिक संघटनांनी भुसावळ पाेलिस ठाण्यासह पोलिस अधीक्षक, पालकमंत्री व महिला आयोगाकडे दिले होते. तसेच तरुणीचे वडील रवींद्र नागपुरे यांनी मंत्रालयात व मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्याची दखल घेत शेवटी रामेश्वरीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा भावी नवरदेवावर भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यात साखरपुडा ६ मार्च रोजी साखरपुडा झाल्यानंतर संशयित हा रामेश्वरीला फोन करून मानसिक त्रास देत होता. या छळास कंटाळून रामेश्वरीने २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती.
मुलीच्या आत्म्यास शांती मिळेल
माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आम्ही दिले होते. यात विविध ज्येष्ठ मंडळींसह सामाजिक कार्यकर्ते, गावातील विविध समाजातील महिला, नागरिकांनी मदत केली. विलंब झाला तरी गुन्हा दाखल झाल्याने गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळेल. त्यामुळे माझ्या मुलीच्या आत्म्यास शांती मिळेल व असे कृत्य करण्यास दुसरा कुणी धजावणार नाही. रवींद्र नागपुरे, मृत रामेश्वरीचे वडील