⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सेवानिवृत्त डीवायएसपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील खानापूर येथील सेंट्रल बँक मॅनेजर यांनी एका अविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर बँक मॅनेजरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपींना सहकार्य केल्यामुळे फैजपूरचे तत्कालीन व हल्ली सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी याचिका पीडीतेने न्यायालयात दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खानापूर येथील सेंट्रल बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध एका अविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फैजपूरचे तत्कालीन डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप करीत पीडीत तरुणीने सेवानिवृत्त उपअधीक्षक पिंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 156 (3) अन्वये चौकशी करून अहवाल करण्याचा आदेश रावेर न्यायालयाने दिल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच प्रकरणात तक्रार घेण्यास टाळाटाळ केलेला आरोपही तरुणीने केला होता मात्र सहा.निरीक्षक नाईक यांना मात्र न्यायालयाने क्लीन चिट दिली. बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी शेंडे याला 13 ऑक्टोबरपर्यंत अंतरीम जामीन उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्‍वास : नरेंद्र पिंगळे
तत्कालीन उपविभागीय पोलीसस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले की, लैंगिक अत्याचार प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. पीडीतेबद्दलही आपली तक्रार नाही मात्र तिला कायद्याचे फारस ज्ञान नाही. पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी म्हणून रावेर आणि फैजपूर उपविभागात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राबविताना आणि कायदेशीर कामे केली मात्र ज्यांचे बेकायदेशीर काम केले नाही, अशा काही दुखावलेल्या हितशत्रूंनी कायद्याचा मुलामा चढवून या तरुणीमार्फत चुकीची तक्रार केली आहे. तपास व न्याय प्रक्रियेतून माझे निर्दोषत्व सिद्ध होईल. न्यायालयाने 156 (3) प्रमाणे या प्रकरणात डिसेंबरपर्यंत चौकशी करून अहवाल मागिलता आहे. आपला न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्‍वास असल्याने अधिक याबद्दल बोलणे उचित होणार नाही, असेही पिंगळे म्हणाले.