⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Court News : बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करीत खून करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप!

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणाऱ्या संशयिताला मरेपर्यंत दंडासह जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज सोमवारी रोजी सुनावली. दरम्यान, आरोपी ‘सिरीयल किलर’ होता, त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने एका बालकाचा खून केल्याचे समोर आले.

तालुक्यातील डांभुर्णी येथील मुलीचे लग्न भोकर गावातील मुलाशी दि.१२ मार्च २०२० रोजी गावात लागणार होते. त्यादिवशी मुलीकडून आलेल्या पाहुण्यात आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील हा सुद्धा भोकर गावी आलेला होता. तेव्हा त्याची गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्यानंतर यश त्याला गावातील शेतात संडासला जायचे म्हणून घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्या अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक अत्याचार करत मारून टाकले. सदर अल्पवयीन मुलगा घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी तालुका पोलीसांत मुलाच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरु असताना मुलाचे प्रेत दि.16 मार्च 2020 रोजी मिळून आले. त्यानंतर अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच दिवशी आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील याला अटक करण्यात आली होती.

तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून दि.10 जून 2020 रोजी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दरम्यान, आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्याकडे एकूण 12 साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. निलेश देवराज,लक्ष्मण सातपुते, ना.तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

खटल्याच्या सुनावणी जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादातून मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा यांच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी आजन्म अर्थात मरेपर्यंतची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 1 लाख 15 हजाराचा दंड सुनावला. सदर खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.


आरोपी यशला अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जळगावात आणले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन बालकाची क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली. भोकर येथील बालक हा 12 मार्चरोजी अचानक बेपत्ता झाला होता. तर त्यानंतर 16 मार्च रोजी भोकर शिवारातील एका शेतात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्याची अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते.आरोपी बालकांवर करायचा अनैसर्गिक अत्याचार


आरोपी यश हा वासनांध झाला होता. तो लहान बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. बालकांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी न्यायचे, त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे आणि त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची, अशी आरोपी यशची गुन्हा करण्याची पद्धत पोलीस तपासातून समोर आली होती.