⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

कापसाला १५००० भाव मिळायलाच हवा !

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या व अवकाळीच्या फटक्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जामनेर येथे केला.

बैलगाड्यांवर शेतकरी व राजकीय पदाधिकारी कापसाचे टोपले घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत होते. महाराणा प्रताप चौकातून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते. कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, तालुक्याचे नेते संजय गरुड यांनी राज्य शासनावर टीका केली. एकेकाळी कापसाच्या भावासाठी उपोषणाला बसणारे मंत्री महाजन आज गप्प का, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेनेचे राहुल चव्हाण, विश्वजीत पाटील, डी.के. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, प्रदीप लोढा, स्नेहदीप गरुड, अरविंद चितोडिया, श्याम घोलप, नाना राजमल पाटील, हिमत राजपूत, संदीप पाटील, अॅड. राजू मोगरे, अॅड. राजू चोपडे, प्रल्हाद सोनवणे, अनिस पठाण उपस्थित होते.

अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. शासनाने कापसाला १५ हजार भाव तहसील द्यावा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी. पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, हरभरा, तूर, ज्वारी, खरेदी तत्काळ सुरू करावी या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कुंभार यांना देण्यात आले.