जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । संक्रांतीनंतर कापसाची बाजारातील आवक कमी होते. त्यामुळे बाजारात कापसाला चांगला भाव मिळतो. मात्र, संक्रांत उलटून १५ दिवस झाले, तरी कापसाचे भाव वाढलेले नाहीत. संक्रांतीनंतरच्या भाव वाढीच्या अपेक्षा भंगल्या असून आता शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीला देत आहेत. सध्या कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. सीसीआयच्या केंद्रावरही सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो.

गेल्या वर्षीही कापसाला भाव नव्हता. या वर्षी तरी कापसाचे भाव वाढणार अशी अपेक्षा शेतकऱ्याला होता. मात्र अद्यापही कापसाचे भाव वाढले नाही. त्यातच साठवून ठेवलेल्या कापसात किडे झाले आहेत. हे किडे चावल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना उपचाराचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कापूस घरात पडून ठेवण्यापेक्षा विकलेला बरा, म्हणून शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्रीला देत आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील बरेच शेतकरी व्यापाऱ्यांकडे जाऊन कापूस विक्रीची विचारणा करत आहे. व्यापारी देखील शेतकरी आपल्याला कापूस मोजण्याची विनंती करत असल्याने सात हजारांच्या आत भाव देऊन कापूस आपल्या दारात आणताना दिसून येत आहे. वास्तविक पाहता संक्रांतीनंतर काही दिवसांतच कापसाच्या भावात समाधानकारक वाढ होत असल्याचा अनुभव आहे. मात्र, संक्रांत उलटून १५ दिवस झाले, तरी कापसाचे भाव वाढलेले नाहीत.
शासनाच्या सीसीआय 3 केंद्रावर सात हजारांवर भाव जरी मिळत असला, तरी त्याला तेथे मोजण्यासाठी वाहन खर्च आणि इतर खर्च परवडत नसल्याने नाईलाजाने खासगी व्यापाऱ्याला शेतकरी आता कापूस मोजून मोकळे होत आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशी पिकावर झाला. ऐन फूलपाती लागवड असलेल्या अवस्थेत जास्तीचा व सलग संततधार पाऊस झाल्याने पन्नास टक्क्यांवर फूलपाती गळून गेली. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली. उत्पादन कमी असल्याने भाव वाढीच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस गोदामातच ठेवला. मात्र, यंदाही कापसाच्या भावाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे.