जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । कापसाला चांगला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उशीरा का होईना, पण कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २८) कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार २२५ रुपये इतका दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी भाव असल्याचं समजतंय. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीवर भर दिला आहे.
दोन वर्षापूर्वी म्हणजेच २०२१-२२ मध्ये कापसाला १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले.
उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरलं. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत ६ हजार ३८० रुपये निश्चित केली.
या एमएसपीवर शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नाही. किमान कापसाला १० ते १२ हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहेत. दरम्यान, उशीरा का होईना, पण आता कापसाचे दर वाढले आहेत. कापसाला प्रतिक्विंटल ८ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहे.
मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात कापसाचे भाव कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहतील, असे कापूस बाजार क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितलं आहे.