जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. या अनुषंगाने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा विचार पोहचवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील भोकर येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात बोलत होते. जळगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदिनीशी उतरणार असून यात शिवसेनेचे भगवा डौलाने फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर यासाठी शिवसैनिकांनी सुध्दा सज्ज राहण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
तालुक्यातील भोकर येथे आज शिवसंपर्क अभियानातील टप्प क्रमांक-२ च्या अंतर्गत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते लक्ष्मणराव वडले, प्रशांत पाचपुते, संतोष चांदे, संकेत बने, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे, पंचायत समिती सभापतींचे पती जनाआप्पा कोळी, माजी सभापती नंदू पाटील, संगायो सभापती रमेशआप्पा पाटील, शिवराज पाटील, रोजगार हमीचे रवी कापडणे, , शिवराज पाटील, सुनील बडगुजर,बालाशेठ लाठी , प्रमोद सोनवणे, मुरलीधर पाटील, रामचंद्र बापू पाटील, विराज कावडिया, डॉ. कमलाकर पाटील, भरत बोरसे, राजेंद्र पाटील, गोपाल जिभाऊ, रवींद्र चव्हाण, संजय पाटील सर, सरपंच पती हरेश पाटील आदींसह परिसरातील २७ सरपंच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांचे भोकर गावात आगमन होताच त्यांचे बँडच्या आतषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील रा. ना. लाठी विद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी नेत्यांपासून ते मेळाव्यातील प्रत्येक उपस्थितांच्या गळ्यात शिवसेनेचे भगवे उपरणे असल्यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून आले.
प्रारंभी गावात मयत झालेल्या ग्रामस्थाला आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. तर, परिसरातील २७ गावांच्या सरपंचांतर्फे व्यासपीठाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. त्यांनी तालुक्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि पक्षबांधणीबाबतची माहिती दिली.
सेवा हाच शिवसेनेचा आत्मा – उपनेते वडले
यानंतर शिवसेनेचे वक्ते गजानन जाधव आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. ते म्हणाले की, शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे गुलाबभाऊ आहेत. त्यांनी पक्षाला मजबूत करतांनाच परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मी उध्दव साहेबांचा पोस्टमन म्हणून येथे आलो असून सेवा हाच शिवसेनेचा आत्मा असल्याने यावरून आपली वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी अतिशय उत्तम कामे केली असून आगामी काळातही सेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर जगात अनेक सेनापती झाले असले तरी आपल्या सैनिकांसमोर नतमस्तक होणारे एकमेव सेनापती हे बाळासाहेब ठाकरे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आधी सुरेशदादा जैन तर आता तीन पंचवार्षिकमध्ये आपण येथे प्रतिनिधीत्व करत असून या परिसरातील विकासकामांना वेग आलेला आहे. या भागात शिवसेना तळागाळात रूजलेली आहे. तसेच या भागातील जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मध्यंतरी आलेल्या कोविडच्या आपत्तीत लोकांच्या मदतीला शिवसेनाच धावून गेली होती याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. तर, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत असून यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. पाटील पुढे म्हणाले की, नेता हा कार्यकर्त्यांवर श्रीमंत होत असतो. शिवसेना पक्षप्रमुख आणि आपली हीच खरी ताकद आहे. अलीकडच्या काळात भोंगा आणि हनुमान चालीसा यांच्या माध्यमातून खर्या मुद्यांपासून लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत असले तरी जनतेला आता हे सर्व प्रकार समजले असून लोकांनी भेदाला थारा दिला नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तर शिवसंपर्क अभियानाच्या दुसर्या टप्यात देखील यशस्वीपणे आपल्या पक्षाचा विचार हा जनतेपर्यंत मांडण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.