जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा एक खासदार तर पाच आमदार निवडून आणू – विनायक देशमुख
जळगाव लाईव्ह न्यूज ।२५ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्याने भारतीय जनता पक्ष कमजोर झाला आहे. शिवसेनेतही दोन गट पडले आहेत. याचा थेट फायदा हा काँग्रेसला होणार आहे. यामुळे आगामी काळात काँग्रेसचा एक खासदार आणि पाच आमदार निवडून अणू असा दावा काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांनी केला आहे
जळगाव येथील काँग्रेस भवनामध्ये पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष श्याम तायडे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी आमदार ईश्वर जाधव, सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात मी संघटना बळकट करण्यासाठी आलो आहे. आपण तेच काम करणार आहोत. प्रदेशाध्यक्षांनी माझी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे आपल्याला जिल्ह्यात एक मोठं आव्हान आहे. ते आपण पूर्ण करणार आहोत.
भारतीय जनता पक्षातून एकनाथराव खडसे यांनी पक्ष त्याग केल्यामुळे पक्षांमध्ये फूट पडली आहे. जळगाव मध्ये महाजन आणि खडसे यांची ताकद विभागली गेली आहे. तर शिवसेनेत देखील आता फूट पडली आहे. याचा संपूर्ण फायदा हा काँग्रेसला होणार आहे. आगामी काळात आपल्याला पक्षाच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पन्नास टक्के जागा म्हणजेच पाच आमदार आणि एक खासदार काँग्रेसला मिळवायचा आहे. असेही यावेळी ते म्हणाले.