जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील इंद्रनिल हाऊसिंग सोसायटी, आयोध्या नगर, पिंप्राळा हुडको, खोटे नगर भागातील रस्त्यांचे काम सुरु केले आहे. या ठिकाणी नळ कनेक्शन व भूमिगत गटारींचे काम बाकी असल्यामुळे त्या ठिकाणी जागा सोडणे आवश्यक असतांना सां.बा.विभागाने त्यासाठी जागा न सोडता सरसकट संपुर्ण रुंदीचा रस्ता तयार करून घेतला आहे. त्यामुळे अमृत योजने अंतर्गंत सुरु असलेल्या नळ कनेक्शन, पाईपलाईन व भूमिगत गटारींसाठी हे रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत.

शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून १०० कोटी, ८५ कोटी व पुन्हा १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. परंतु शहरात अनेक भागांमध्ये अमृत योजनेअंतर्गंत सुरु असलेल्या जलवाहिनी व भूमिगत गटारींचे काम बाकी असल्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या पाईपलाईन टाकण्यासाठी जागा सोडून रस्त्यांचे काम करण्यात यावे, असा ठराव करून मनपाने सा.बां. विभागाला ना हरकत दिली असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाईपलाईनसाठी जागा न सोडताच रस्त्यांची केली जात असल्यामुळे त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने ना हरकत देतांना ज्या अटी घालून दिल्या आहेत. या अटींचा सर्रास भंग सा.बां.विभागाकडून केला जात आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी सा.बां.विभागाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती विचारली असता सा.बां.विभागाच्या अभियंत्यांकडून माहिती दिली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन तयार केलेल्या रस्त्यांमध्ये पाणी पुरवठा लाईन व भूमिगत गटारीसाठी जागा सोडली नसल्यामुळे जलवाहिनी व भूमिगत गटारीसाठी ते रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत. सा.बां.विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे व समन्वयाचा अभावामुळे नवीन काँक्रिट रस्ते फुटणार असून नागरिकांना पुन्हा नरक यातना भोगाव्या लागणार आहेत.
भूमिगत गटारींचा डीपीआर तयार करण्यासाठी दि.७ रोजी झालेल्या महासभेत प्रकल्प सल्लागार नियुक्तीचा ठराव करण्यात आला असून त्या मक्तेदाराला भूमिगत गटारींचा डीपीआर तयार करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महिन्याभरात डीपीआर तयार झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल व त्यावेळी भूमिगत गटारींसाठी ज्या ज्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत ते रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत.