जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कमबॅक केलं असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट हवामान खात्यांकडून जारी करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याचा पंढरवाडा संपला तरी म्हणावा सता पाऊस न झाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. मागील काही दिवसापासून हवामान खात्याकडून पावसाचा येलो जारी केला जात असला तरी अद्यापही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांना किंचित दिलासा मिळत आहे. मात्र जोरदार पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील पाणीसाठी किंचित देखील वाढलेला नाहीय.
दरम्यान, मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.