जिल्हाधिकाऱ्यांची अग्रणी बँक व्यवस्थापकाला नोटीस
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । आगामी खरीप हंगामासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या आढावा बैठकीला विना परवानगी गैरहजर राहणारे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन भवनात खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर उपस्थित होते. खरीप हंगामासाठी खते व बियाणे यांचे नियोजन तसेच पीक कर्ज वाटप याबाबत पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या अनुषंगाने अग्रणी बँक व्यवस्थापकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अरुण प्रकाश यांना कृषी विभागातर्फे कळवण्यात आले होते. तरी देखील ते जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता खरीप हंगाम आढावा बैठकीला गैरहजर राहिले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अरुण प्रकाश यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.