⁠ 
सोमवार, मे 20, 2024

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकासदराची राज्यस्तरीय तुलना करायची झाली तर फक्त 2.4 टक्के आहे. तो दर वाढविण्याची गरज असून ती जबाबदारी बँकांची आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण व्यावसायिक वाढ करण्याचा निश्चय केला तर ते शक्य आहे. त्यासाठीच आजची कार्यशाळा आयोजित केली असून जिल्हा प्रशासन तुमच्या मदतीला आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

कांताई हॉल येथे बँकासाठी आयोजित धनसंवर्धन कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. जळगाव जिल्ह्याला पारंपारिक बँकिंग संस्कृती आहे. एकेकाळी सोन्याच्या ठेवीच्या बदल्यात कर्ज देण्याची पद्दत होती. त्यामुळे जळगावला सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. यासाठी थोड्या प्रयत्नाची गरज आहे, ते प्रयत्न केले तर हे दिवस पलटू शकतात.

बँकेत माणसं उभी करण्याची ताकत
शासनाने कितीही ठरवले तरी बँकेच्या सक्रीय सहभागाशिवाय आर्थिक विकास शक्य नाही हे सांगून आपण पुण्यात असताना बँकेमुळे मी उभं राहिलो असे सांगणारे लोकं मला भेटायची. जळगाव जिल्ह्यात मला अशा यश कथा सांगणारे फारसे दिसत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. माणसं आर्थिक दृष्ट्या उभं करणं हे तुमचं काम आहे, त्यासाठी स्मार्ट काम करा. शासकीय कागद पत्राची अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासनाला सांगा आम्ही मदत करू. पण जळगावचे हे चित्र तुमच्या सहकार्याने बदलायचे आहे असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात विकासाची क्षमता
जळगाव जिल्ह्यात विकासाची मोठी क्षमता आहे. जळगावची केळी, प्लास्टिक, दाळ निर्यात होते. त्यामानाने कृषी बँकिंगची स्थिती चांगली आहे. पण म्हणावे तेवढे प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योगात बँकाचा रोल अधिक सकारात्मक दिसत नाही. जळगावकरांना स्पर्धेत उतरावं लागेल, एकेकाळी देशाच्या मार्केट मध्ये 12 केळी मागे 3 जळगावची असायची आता हे प्रमाण घसरून 6 केळीत एक केळी जळगावची आहे. याचा विचार होणं गरजेचं असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकित सहकार्याची अपेक्षा
येणाऱ्या लोकभा निवडणुका पारदर्शक होण्यासाठी बँकेचा रोल महत्वाचा असणार आहे. बँकेत येणाऱ्या रक्कमेवर लक्ष ठेवण्यापासून ते निवडणुकित होणाऱ्या आर्थिक गैर व्यवहार रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी ज्या टीम लागतात त्यात तुमच्या पैकी अनेकांचे सहकार्य लागेल, ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यात सहभागी व्हा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जळगाव जिल्ह्याचा पुढच्या काही वर्षाचा धोरणात्मक विकासाचा आराखडा सांगताना जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे म्हणाले, जिल्ह्यात रियल इस्टेट आणि सोने व्यवहारात वाढ दिसत असली तरी इतर क्षेत्रात मात्र अधोगती आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, सेवा उद्योग यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित करत यात बँकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे नमुद केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यशाळेमागची भूमिका विशद केली.