जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२५ । उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह महाराष्ट्रात गुलाबी थंडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसात जळगावातील किमान तापमानाचा पारा ४ अंशांनी घसरला. मंगळवारी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात आजपासून आगामी तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत पारा ६ अंशापर्यंत खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जळगावमधील किमान तापमानात चढ उतार सुरु आहे. रविवारी (७ डिसेंबर) पारा १२ अंशावर होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून किमान तापमानात घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसांत रात्रीच्या किमान तापमानात तब्बल ४ अंशांची घट नोंदविण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी १० ते १२ डिसेंबर या कालावधीत थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, पारा ६ अंशापर्यंत खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

येत्या तीन दिवसांत जिल्ह्यातील रात्रीच्या तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीचा कडाका वाढणार असल्याने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात रात्रीचा सरासरी पारा हा १५ ते १६ अंश इतका असतो, मात्र यंदाच्या हंगामात नोव्हेंबरमध्ये सरासरी तापमान १२ अंशांवर आले होते. डिसेंबर महिन्यातील 3 सरासरी तापमानातदेखील यंदा मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जळगावातील आगामी पाच दिवसाचा हवामान अंदाज?
दिनांक, रात्रीचे तापमान, दिवसाचे तापमान
१० डिसेंबर : ७ अंश, २७ अंश
११ डिसेंबर : ६ अंश, २७ अंश
१२ डिसेंबर : ७ अंश, २८ अंश
१३ डिसेंबर : ८ अंश, २७ अंश
१४ डिसेंबर : ९ अंश, २८ अंश







