जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२५ । डिसेंबरची चाहूल लागताच जळगावसह राज्यभर तापमानात घट जाणवू लागली असून यामुळे थंडीचा कडाकाही जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. आज जळगावसह सहा जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने महाराष्ट्रातील वातावरणात गारवा पसरत असून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे.बंगालच्या उपसागरातील ‘डिटवाह’ चक्रीवादळच संकट निघून गेल्यानंतर त्याचे अवशेष असलेले तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ सक्रिय आहे. मात्र याचा फटका महाराष्ट्राला बसणार नसून राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे.









