जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२५ । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे ई-चलन फाडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत केली. राज्यातील प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा राबवण्यात येणार असून सरकारच्या या निर्णयामुळे वाहन चालकांकडून चिरी-मिरी घेण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांवर कारवाई केली जाते. वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार ई-चलनची कारवाई करतात. मात्र ही कारवाई करत असताना काही अधिकारी खासगी मोबाइलचा फोनचा वापर करत आहेत. तसेच स्वतःच्या सोयीनुसार ई-चलन प्रणालीमध्ये अपलोड आणि चुकीच्या पद्धतीने चलन तयार करीत आहेत. यातून वाहनचालकांची लूट होत असल्याचा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॉडी कॅमेऱ्याचा वापर करणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ई-चलनची कारवाई करत असताना अनेकदा वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत वाद होतात. बॉडी कॅमेरा असेल तर या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच भविष्यात एखादा वाद झाल्यास त्याच्यावर निर्वाळा करण्यात येऊ शकतो.
ई-चलन फाडल्यानंतर 6 महिन्यांत वसुली
फडणवीस म्हणाले, ई-चलन केल्यानंतर त्याचा एसएमएस येण्यासाठी वेळ लागत होता. त्यावरही काम सुरू आहे. सिस्टिम अपडेट केल्यानंतर वाहन चालकांना तत्काळ एसएमएस येईल अशी सुविधा दिली जाईल. या प्रकरणी अनेक जुन्या ई-चलनाची वसुली बाकी आहे. ई-चलन जुने झाल्यानंतर त्याची वसुली होत नाही. त्यामुळे लोकअदालत घेऊन काही प्रमाणात सूट देऊन वसुली करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार, यापुढे ई-चलन तयार झाल्यानंतर 6 महिन्यांत त्याची वसुली व्हावी अशी व्यवस्था सरकार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.












