प्रभाग १६ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग १६ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभागात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे.

“महायुतीला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रचाराचा हा झंझावात पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा घणाघात आमदार राजूमामा भोळे यांनी केला. महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभाग १६ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार वंदना संतोष इंगळे (१६ ब), रंजना विजय वानखेडे (१६ क) आणि सुनील वामनराव खडके (१६ ड) यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी उमेदवारांचे आणि आमदार भोळे यांचे औक्षण करून जंगी स्वागत केले.
या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे मुख्य आकर्षण ठरले. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






