⁠ 
रविवार, मे 5, 2024

नागरिकांनो कन्नड घाटातून प्रवास करत असाल तर सावधान..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कन्नड घाटात छाेट्या महादेव मंदिराजवळ साेमवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. तर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट खाेल दरीत काेसळला. कन्नड घाटात मेणबत्ती पॉइंटजवळ ही घटना घडली. सकाळी अर्ध्या तासाच्या अंतरात ह्या दाेन्ही घटना घडल्याने महामार्ग पाेलिसांची चांगलीच धावपळ उडाली. या घाटातून प्रवास करतांना वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी, पावसामुळे धोका निर्माण झाला आहे.

चाळीसगाव तालुक्यासह कन्नड घाटात गेल्या दाेन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ वरील कन्नड घाटात साेमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास छोटा महादेव मंदिराजवळ दरड कोसळली. महामार्ग पोलिसांनी माती व दगड दूर करून वाहतूक सुरळीत केली. दरड कोसळल्याने सुदैवाने कुठलीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. गतवर्षी कन्नड घाटात अतिवृष्टी झाल्याने आठ ठिकाणी दरडी कोसळल्याने घाटातील वाहतूक तीन महिने बंद होती.

दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून धुळ्याकडे जात असलेला आयशर ट्रक कन्नड घाटातून जात असतांना पाॅइन्टजवळील वळणावर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यावेळी चालकाने उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. ट्रकमध्ये काय माल होता हे समजू शकले नाही. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी टेम्पाे कोसळला होता. त्यावेळीही चालकाने वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव वाचला होता. घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे.

कन्नड घाटात छोट्या महादेव मंदिराजवळ दरड कोसल्याने गस्तीवर असलेले एपीअाय सतीश पाटील, पोलिस नाईक पांडुरंग पाटील, नितीन ठाकूर, नरेश सोनावणे, जितेंद्र माळी, सोपान पाटील, रमेश पाटील, सुभाष सोनवणे, चंद्रकात पाटील, गणेश चव्हाणी मदतकार्य सुरु केले. पोलिसांनी दरडीचे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.