जळगावमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवेने पंपांवर नागरिकांची तोबा गर्दी ; परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण..

मार्च 23, 2026 10:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२६ । एकीकडे युद्धामुळे गॅस सिलींडरचा तुटवडा जाणवत असताना त्यातच जळगाव शहरात काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे आवाहन करत परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

petrolpump

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जळगाव शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून इंधनाचा साठा करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळण्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अधिकृत शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी आणि शांतता, संयम व सहकार्य राखावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी खालील बाबींची विशेष दक्षता घ्यावी :
१. कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचा संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
२. नाहक भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल/डिझेल खरेदी करू नये.
३. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर विश्वास ठेवावा.
५. अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
६. कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.
जिल्हा प्रशासन नागरिकांना शांतता, संयम व सहकार्य राखण्याचे आवाहन करीत आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खात्री बाळगावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now