⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भूमिगत गटारीच्या चेंबरपर्यंत पाईप जोडणीची जबाबदारी नागरिकांचीच

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । शहरात भूमिगत गटारीचे काम सुरु असून अर्ध्या जळगावात पाईप टाकण्याचे आणि चेंबर बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जुने जळगाव परिसरात ड्रेनेजच्या चेंबरपर्यंत घरातील सांडपाण्याचा पाईप आणण्यासाठी ४०० रुपये मजुरी आकारली जात असल्याची ओरड नागरिकांकडून होत होती. दरम्यान, याप्रकरणी मनपा अभियंत्यांशी संपर्क साधला असता चेंबरपर्यंत पाईप पोहचविण्याची जबाबदारी नागरिकांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव शहरात भूमिगत गटारीत घरातील सांडपाणी आणि स्वच्छतागृहांची घाण सोडण्यासाठी दोन घरांजवळ एक चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमिगत गटारीसाठी अनेक प्रभागात रस्ते खोदण्यात आलेले आहेत. शहरातील काही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु होणार असल्याने चेंबरमध्ये घरातील सांडपाणी आणि शौचालयाचा पाईप सोडण्याचे काम करण्यात येत आहे. जुने जळगाव परिसरातील मठ गल्लीत याच कामासाठी मजुरी म्हणून प्रत्येक घराकडून ४०० रुपयांची आकारणी केली जात असून साहित्य वेगळे मागविले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.

जळगाव लाईव्हने नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत मनपा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही जबाबदारी नागरिकांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरातील व्यक्ती ज्याप्रमाणे घरातील सर्व स्वच्छतागृहांच्या सांडपाण्याचा पाईप गटारीत सोडतो तसेच शौचालयांच्या टाकीतील अतिरिक्त पाणी वाहून नेणारा पाईप गटारीत सोडत असतो, त्याच प्रमाणे या भूमिगत गटारीचे देखील नियोजन आहे. घरातील सर्व स्वच्छतागृह, स्नानगृहे, इतर सांडपाणी वाहून नेणारे पाईप तसेच शौचालयांच्या टाकीचा पाईप नागरिकांनी चेंबरपर्यंत आणून पोहचविणे आवश्यक आहे. या कामासाठी लागणारे साहित्य आणि मजुरी नागरिकांनाच द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा :