गुरूवार, जून 8, 2023

होम ग्राउंडवर झाला चिमणआबांचा गेम ; पारोळ्यात सत्ता गडगडली !

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होत असून अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. दरम्यान, पारोळा बाजार समिती संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, १८ पैकी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडीने विजयी आघाडी घेतल्याचे वृत्त येत आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पारोळा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्यात टफ फाईट होईल असे म्हटले जात होते. मात्र मतमोजणीच्या प्रारंभी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडी आघाडीवर आहे.

विकास सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे, या बाजार समितीवर गेल्या अकरा वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांची सत्ता होती, विशेष म्हणजे बिनविरोध निवडून येत होते.

आज सकाळी पारोळा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. यात मविआ प्रणीत पॅनलने १५ जागांवर विजय संपादन केला. यात मावळते सभापती तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांना देखील पराभवाचा धक्का बसला. विजय जाहीर होताच मविआच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.