⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस अवश्य द्यावा : महापौर जयश्री महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी.. शासनाने पोलिओ लसीकरण मोहीम सुरु केली असून जळगाव शहरातील नवजात बालक आणि पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस अवश्य देण्यात यावा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जळगाव शहर मनपातर्फे छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.राम रावलानी, इतर डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते चिमुकली दिविशा वाणी हिस पोलिओ डोस पाजण्यात आला.

महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, भारतात पोलिओचा रुग्ण नसला तरी पोलिओ होऊच नये असा मानस शासनाने ठेवला आहे. दरवर्षी शासनाकडून पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत असते. आज ज्यांना शक्य नसेल अशा पालकांनी पुढील आठवडाभरात आपल्या घरी येणाऱ्या परिचारिकांकडून पोलिओ डोस पाच वर्षाखालील बालकांना अवश्य द्यावा, असे आवाहन महापौरांनी केले.