⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दुर्दैवी ! आजी-आजोबांकडे आलेल्या नातवाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आजी-आजोबांच्या गावाला आलेल्या नऊ वर्षीय त्यांच्या नातूला वीज तारांवरुन पतंग काढताना वीजेच्या तीव्र धक्का लागला हाेता. दरम्यान, उपचार सुरु असता या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. दर्शन प्रशांत पाटील असे या मृत बालकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की, कजगाव येथील ब्रिजलाल दामू पाटील यांच्या अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील मुलीचा तिसरीत शिक्षण घेणारा ९ वर्षीय मुलगा दर्शन प्रशांत पाटील हा दोन दिवसांपूर्वीच कजगाव येथे आजी-आजोबांकडे आला होता. दर्शन ११ रोजी आजोबांच्या घराच्या छतावर पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना त्याचा पतंग छतावरून गेलेल्या विजेच्या तारांवर अडकला. पतंग काढण्याच्या प्रयत्नात दर्शन याला विजेचा तीव्र धक्का बसला.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत तत्काळ चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु, ते जखमी बालकाला वाचवू शकले नाहीत. अखेर उपचार सुरु असताना दर्शन पाटील याने १६ रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत दर्शन याच्यावर शोकाकूल वातावरणात त्याच्या मूळगावी कावपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने कजगाव व कावपिंप्री परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.