⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

तब्बल दोन वर्षानंतर दहीहंडी, गणेशोत्सव दणक्यात साजरे होणार, मुखमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । कोरोना (Covid 19) पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष अनेक सण हे निर्बंधांमध्ये राहून साजरे करावे लागले होते. मात्र कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर यंदा दहीहंडी, मोहरम तसेच गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरे होणार आहे. त्यावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

एसटीच्या जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणपतीला गावी जाणारे येणाऱ्यांची ही चिंता कमी झाली आहे. कोविडमुळे गेली दोन वर्ष सण साजरे करता आले नाहीत. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत सण साजरे झाले पाहिजेत याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजे यासाठी खेटे घालायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

उंचीची मर्यादा हटवली
या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. खड्डे खोदण्यासाठी पैसे घेतात. मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून हमी पत्र घेत होते. ते घेण्यास मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असं सांगितलं. नियमांचं पालनं करावं लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.