स्वस्त धान्य दुकानदारांची उडाली दाणादाण : पुरवठा निरीक्षकांसह सात जणांना नाेटीस
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । शेंदुर्णी येथील स्वस्तधान्य गैरव्यवहार प्रकरणी जामनेरच्या पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसीलदारांना कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी पुरवठा निरिक्षक विठ्ठल काकडेंसह सात जणांना नोटीस बजावली असून, ४८ तासात म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेंदुर्णी येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा निरिक्षक विठ्ठल काकडे यांच्या सांगण्यावरून प्रत्येकी दोन गोण्या धान्य अनधिकृतरित्या एका व्यक्तीला दिले. रविंद्र आत्माराम पवार या तरूणाने या प्रकाराचे चित्रिकरण केले. त्यावरून हा धान्य गैरव्यवहार उघडकीस आला. मात्र पुरवठा निरिक्षक काकडे यांनी चित्रिकरण करणाऱ्या रविंद्र पवार याच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसेच धान्य काळ्या बाजारात दिले नसून प्रमाणीकरणासाठी जामनेरला आणल्याचा कागदोपत्री बनाव करण्याचा प्रयत्न पुरवठा निरिक्षक काकडे यांनी दुकानदारांच्या माध्यमातून चालवला होता. मात्र पुरवठा निरिक्षक काकडे यांनी आपल्याकडून कुठल्याही धान्याचे प्रमाणिकरण करवून घेतले नसल्याचे गोदाम किपर अशोक सोनवणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुरवठा निरिक्षक काकडे यांचे धान्य घोटाळा दडपण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरले.
पुरवठा निरिक्षक विठ्ठल काकडे, दक्षिणभाग सहकारी सोसायटी, शेंदुर्णी दुकान नंबर ०१, उत्तरभाग सहकारी सोसायटी, शेंदुर्णी, दुकान नंबर ०२, पिक संरक्षण सहकारी सोसायटी दुकान नंबर ०३, शेंदुर्णी एज्युकेशन सहकारी सोसायटी दुकान नंबर १३, संध्या गणेश कुलकर्णी दुकान नंबर ९८, जी.आर.कुलकर्णी दुकान नंबर ९९, ए.ए.गरूड, दुकान नंबर १०० या सर्वांना तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.