जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यात तात्काळ तिकीटसह रेल्वेच्या चार्टच्या नियमातही बदल झाला. अशातच आता रेल्वेनं आरएसी तिकिटाबाबत नियम बदलला आहे. रेल्वेने १ ऑगस्टपासून आरएसी(RAC) तिकीट धारकांना पूर्ण सीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आरएसी तिकिटे असलेल्यांनाही पूर्ण बसण्याचा अधिकार मिळेल.

१ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या बदलानंतर, आरएसी प्रवाशांना आता अर्ध्या जागेऐवजी पूर्ण जागेचा लाभ मिळणार आहे. आता आरएसी प्रवाशांना अर्ध्या नव्हे तर पूर्ण जागा दिल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रवाशाला पूर्ण सुविधा मिळाव्या म्हणून रेल्वेमधील आरएसी जागांची संख्या कमी केली जाणार आहे. हा नियम सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये लागू केला जाईल.

आरएसी तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोयीचा सामना करावा लागत होता. एवढेच नव्हे तर एकाच सीटवर दोन लोकांना बसणे/झोपणे अत्यंत कठीण होत होते. पण, आता आरएसीत पूर्ण सीट मिळणार असल्याने दिलासा मिळाला.
RAC म्हणजे काय?
रेल्वेमध्ये RAC चे पूर्ण रूप ‘रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन’ आहे. हे एक प्रकारचे तिकीट आहे ज्याद्वारे प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. मात्र प्रवाशांना RAC तिकिटावर पूर्ण बर्थ मिळत नाही. RAC तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना त्यांची सीट दुसऱ्या प्रवाशासोबत शेअर करावी लागते.












