जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । जळगाव (Jalgaon) विमानतळावरून पुणे (Pune) विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय. जळगाव-पुणे या आठवडाभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून ते आता चार दिवस करण्यात आले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

खरंतर जळगाव विमानतळावरून उडान योजनेंतर्गत गोवा (Goa), पुणे (Pune), हैदराबाद (Hyderabad), तसेच मुंबई (Mumbai) व अहमदाबाद (Ahmedabad) विमानसेवा नियमित सुरू आहे. यात जळगाव-पुणे या विमानसेवेला अधिक प्रतिसाद मिळत असताना चार दिवस सुरू असलेली विमानसेवा पूर्ण आठवडा करण्यात आली.
परंतु काही महिन्यांपासून विमान कंपनीकडून विमान रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात विमान कंपनीने वेळापत्रकात बदल करून पुण्यासाठी आता फक्त सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार अशी विमानसेवा सुरू ठेवली आहे. तर हैद्राबादची देखील गुरुवार, शनिवार, रविवार अशी विमान सेवा सुरू आहे. विमान ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेवर माहिती दिली जात नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.