वातावरणात बदल, अशी घ्या स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ मार्च २०२३ | मागील काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असा दुहेरी ऋतूचा अनुभव येत आहे. मात्र, या ऋतू बदलाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, तापीच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वातावरणामुळे सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यात जंतूसंसर्गातून न्यूमोनिया आजाराचा धोका बळावला आहे. त्यातच सर्दी आणि खोकला या दोन्ही तक्रारींमुळे कफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच न्यूमोनियाची लागण होत असल्याचे डॉक्टर सांगतात. यासोबतच तापाच्या रुग्णांमध्येदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. अशा वेळी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची कशी काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

फेेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली होती. जळगाव शहरासह जिल्हाभरात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचला होता. मात्र मार्च महिना उजाडताच अचानक तापमानात बदल झाला. त्यातच दोन-तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच दोन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. या ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालये फुल्लं झाली आहेत. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ऋतू बदलाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचा असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचेही प्रमाण वाढले
दिवसा उन्हाच्या झळा तर, सायंकाळनंतर पहाटेपर्यंत शीतलहरी शरीराला झोंबत असल्याने याचा सर्व परिणाम हा लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांना होत आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे. लहान मुलांना सर्दीमुळे कान दुखणे, ताप येणे यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढून ताप येतो. ताप वाढत गेल्यास प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचेही प्रमाण वाढले आहे. सध्या बालरुग्णालयात न्यूमोनियाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येते. सर्दी, खोकल्याचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. याशिवाय वृद्धांनाही खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे चित्र आहे.

वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि दुपारी बसणारे उन्हाचे चटके अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळवण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी आपल्या तब्येतीची खाली दिल्या प्रमाणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

  • संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे.
  • लक्षणे दिसताच वेळीच उपचार सुरू करावेत.
  • सर्दी-खोकला वाढण्याआधीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • लहान मुलांमध्ये श्वसनसंबंधी तक्रारी वाढत आहेत, त्यांची काळजी घ्यावी.
  • दिवसा उष्णता असली तरी थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्सचा वापर टाळावा.
  • शक्यतो उकळून गार केलेले पाणी प्यावे.
  • सकाळच्या वेळी बाहेर फिरताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा.
  • सकाळी थंडी असल्यास बाहेर जाणे टाळावे.

उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी
हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण कमी पाणी पितात. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने तापमानात वाढ होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमानही वाढल्याने अनेक वेळा थकवा जाणवतो. उन्हाळ्यात शरीराला पाणी कमी पडू नये, म्हणून भरपूर पाणी प्यावे. मात्र, पाणी एकदम पिऊ नये. नियमित आहारासोबत शरीरातील पाणी पातळीचा समतोल राखण्यासाठी उन्हाळी फळे खाण्यावर भर द्यावा. यामध्ये टरबूज, खरबूज, द्राक्ष, काकडी, अंबा, खिरे अशा फळांचा आहारात समावेश करावा. शिवाय दही, ताकाचे सेवन करावे. उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे. उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स पिणे शक्यतो टाळावे. कोल्ड ड्रिंक्स ऐवजी उसाचा रस, लिंबू पाणी प्यावे.