शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! महाराष्ट्रातील ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । एकीकडे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून सर्वत्र पहाटचा गारठा वाढला आहे. मात्र यातच हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने राज्यातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. यासोबत गोव्यातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची शक्यताआहे. गोव्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, राज्यातील इतर काही भागात तापमान वाढण्याचा आयएमडीचा अंदाज आहे. दिल्लीतही अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.