⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | यंदा कर्तव्य आहे… २० नोव्हेंबरपासून वाजणार वाजंत्री, चाैघडा, लग्नासाठी ६३ शुभमुहूर्त

यंदा कर्तव्य आहे… २० नोव्हेंबरपासून वाजणार वाजंत्री, चाैघडा, लग्नासाठी ६३ शुभमुहूर्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । कोरोनाचे सावट बऱ्यापैकी दूर झाल्यानंतर यंदा अनेकांनी लग्नाचे बेत आखले आहेत. दिवाळीनंतर तुलसी विवाह झाल्यावर यंदा कर्तव्य करायला वर्षभरात ६३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा १० मुहूर्त अधिक आहेत. २० नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होणार असून, ९ जुलैपर्यंत चालणार आहे. डिसेंबर व मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हे दोन महिने लग्नाच्या धामधुमीचे ठरतील.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर लग्नसराईला ब्रेक लागला होता. गेल्यावर्षी दिवाळीनंतर ५० लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्यात आल्याने नागरिकांना लग्नात आनंद साजरा करता आला नाही. लग्नांना गर्दी झाली तरी कारवाईचा दणका बसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करीत लग्न सोहळे साजरे केले. यंदा तुळशी विवाहानंतर २० नोव्हेंबरपासून सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यंदा कर्तव्य असलेल्या वधू-वरांसाठी ६३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. डिसेंबर व मे या दोन महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी ११ मुहूर्त असल्याने वधू-वर पित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू आहे. अनेकांनी तारखा निश्चित केल्या असून हॉल, बँड, डीजे बुकिंग सुरु केल्या आहेत.

असे आहेत मुहूर्त
दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यावर लग्नसराईचे सनई, चौघडे वाजण्यास सुरुवात हाेईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये २०, २९, ३० यानंतर डिसेंबरमध्ये १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९ अशा तारखा आहेत. तसेच २०२२ मध्ये जानेवारीत २०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारीत ५, ६, ७, १०, १७, १९, मार्चमध्ये २५, २६, २७, २८, एप्रिल १५, १७, १९, २१, २४, २५, मेमध्ये ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७, जून १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२ तर जुलै महिन्यात ३, ५, ६, ७, ८, ९ अशा तारखा असून यंदा ६३ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० मुहूर्त अधिक आहेत.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.