जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । चाळीसगाव शहर पोलिसांनी हिरापूर रोडवर सापळा रचून बोलेरो गाडीतून होणारी गुटख्याची तस्करी उघडकीस आणली आहे. वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात लाखोंचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला आहे. सुमारे ७ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा गुटखा शहर पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी या कारवाईत वाहनासह १५ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी वाहनाचे दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, पोकॉ. आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे,योगेश बेलदार,राहुल सोनवणे,समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हिरापूर रेाडवर राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ वाहनांच्या तपासणी करण्याच्या हेतूने एम.एच.४१ एयू. ३२१० हे महिंद्रा पिकअप वाहन अडवले. तपासणीत या वाहनात ताडपत्रीने झाकून ठेवलेला सुगंधीत पानमसाला, सुगंधीत तंबाखू असा साठा मिळून आला.पोलीसांनी वाहनचालकाकडे वाहनाबाबत कागदपत्रे मागितली असता कोणतीही कागदपत्रे आढळून आले नाही.

यात सुमारे ७ लाख १९ हजार २० रूपये किंमतीचा गुटखा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुटखा तसेच ८ लाख रूपये किंमतीचे वाहन असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा दीपक प्रविणचंद बेदमुथा रा.नागद ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर याचा असून त्याने सांगितल्यानुसार गुटख्याची वाहतुक करीत असल्याचे जप्त केलेल्या वाहनचालकाने चौकशीत सांगितले. वाहन चालक सलीम मुनीर खान (२४) रा. ग्रीन पार्क,जारगाव चौफुली, पाचोरा, अरबाज इब्राहीम पठाण (२२) रा.सार्वे ता. पाचोरा व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन रा. नागद ता.कन्नड या तिघांच्या विरोधात जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा झाला आहे.












