जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ED, CBI या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहे.
आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आले आहे. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोणतीही चूक नसतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्यासाठी ईडी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून यातूनच एकनाथराव खडसे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले. सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.