जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी पैसे घेऊन काम न करणाऱ्या संशयित ठेकेदाराला २६ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. वीरेंद्रकुमार राजेंद्र पाटील (रा. मायादेवी मंदिरामागे, महाबळ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामसेवकांनी गावात घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसाठी पाटील याला ५ लाख ५७ हजार १०० रुपये दिले होते. परंतु त्यांनी कामे केली नाहीत. तसेच विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्याचा देखील पुरवठा केला नाही. या प्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पाटील बेपत्ता झाला होता. तो २६ रोजी शहरातील भास्कर मार्केट परिसरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अमोल देवडे, अशरफ शेख, निजामोद्दीन, सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपासासाठी पहूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.