जळगाव जिल्हा

हरभरा-मसूर बियाणे मोफत मिळणार! शेतकऱ्यांनी १९ ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज । हरभरा व मसूर पिकांच्या सुधारीत वाणांचा प्रसार करून जिल्ह्यातील कडधान्यांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी बियाणे मिनीकिट वितरण योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असून, त्यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे तत्त्व लागू राहणार आहे.

या योजनेंतर्गत हरभरा पिकासाठी १ हजार २२ मिनीकिट, तर मसूर पिकासाठी ७०० मिनीकिटचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हरभरा बियाण्याच्या प्रत्येक मिनीकिटचे वजन १६ किलो, तर मसूर बियाण्याच्या प्रत्येक मिनीकिटचे वजन ८ किलो आहे. या दोन्ही पिकांसाठी बियाणे मिनीकिटचा लाभ १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.

योजनेची अधिक माहिती व अर्जासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button