जळगाव पोलिस दलाच्या पेट्रोल पंपात १ कोटी ३३ लाखाचा अपहार; PSI विरुद्ध गुन्हा दाखल

फेब्रुवारी 18, 2026 2:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील भास्कर मार्केटजवळील पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपाच्या तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या वाघ फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

psi wagh

काय आहे प्रकार?
पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील या पेट्रोल पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविली होती. मात्र, त्यांनी दोन ते तीन महिन्यांपासून बँकेत रक्कम जमा केली नाही. पंपावरील रोख रक्कम वेळोवेळी बँकेत भरणा करण्याबाबत वाल्मीक वाघ यांना प्रभारींनी सूचना देण्यासह रोखवही व भरणा पावती पुस्तक दाखविण्याविषयी सांगितले. मात्र, प्रत्येक वेळी बहाणे करून रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

प्राथमिक चौकशीत वाघ यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेत नियमित भरणा न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर पडताळणीचे आदेश दिले.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी एक एप्रिल २०२५ ते नऊ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. त्यानुसार एकूण चार कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची पेट्रोल विक्री झाल्याचे समोर आले. त्यापैकी फक्त तीन कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपये बँकेत जमा झाल्याची नोंद आहे; मात्र, उर्वरित एक कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तपासणीदरम्यान पंपाच्या तिजोरीत केवळ एक लाख ९६ हजार २१९ रुपये आढळले. बँक भरणा पावत्या व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने अपहाराचा संशय अधिकच बळावला.

याप्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५) (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात) आणि कलम ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.

पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावरील इतक्या मोठ्या रकमेचा अपहार दीर्घकाळ वरिष्ठांच्या लक्षात कसा आला नाही, बँकेत नियमित भरणा होत नसल्याचे वेळीच का तपासले गेले नाही, तसेच इंधन साठा खरेदी व विक्री याची पडताळणी का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now